Rivers of Life-banner
Community
story
06
/11

जीवनवाहिनी

मुठा नदी आणि तिच्यावर अवलंबून वसाहती
द्वारा - अभय कानविंदे
पुणे शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्या या गजबजलेल्या शहरातील प्रत्येक घटनांच्या साक्षीदार आहेत आणि त्यामुळेच या नद्या भारतातील सर्वात प्रदूषित नद्यांमध्ये गणल्या जातात यात कोणतेही आश्चर्य नाही.त्यातच रस्त्यांची बांधकामे, जमिनीचे अतिक्रमण, सांडपाण्याचा उत्सर्ग आणि नदीपात्रातील मेट्रो-मार्ग यामुळे त्यांच्यावर अधिकाधिक ताण पडत आहे.

आणि तरीही, त्यांच्या कथेला अनेक पदर आहेत. या नद्या जरीही प्रदूषित आणि खालावलेल्या असल्या तरीही त्या लोकांना फक्त आसराच नाही तर जगण्यासाठी आधारही देतात. एक प्रकाशचित्रकार म्हणून, शहराच्या इतक्या दाट लोकवस्तीमध्ये मुठा नदीच्या आधाराने तयार होणारे रोजगार आणि वसाहतींचे विविध प्रकार पाहून मी थक्क होतो. तिथे मासेमारी होते, गाई गुरांचे पालन होते. वनस्पती गोळा करणारे, छायाचित्रकार, नाणी गोळा करणारे आणि अगदी कृमी गोळा करणारे लोकही या अल्पशा उत्पन्नातून आपले कुटुंब चालवतात. जी नदी शहरातील लोकांना मृत वाटते ती खरी तर एक जागृत परिसंस्था आहे. हे आशेचे किरण साठवून ठेवणे हा माझ्यासाठी एक आनंददायी अनुभव होता. जर पुण्यातील या नद्या लोकांनी पुन्हा जागृतावस्थेत आणल्या आणि त्यांचे योग्य प्रकारे जतन केले तर त्या कार्यकारी उर्जेचा एक मोठा स्रोत ठरतील.

या नद्यांच्या पात्रातील मी पूर्वी कधीही ना पाहिलेला एक व्यवसाय पाहून मी चकित झालो. Covid-19 lockdown च्या सुरुवातीच्या काळात मी काही लोकांना नदीपात्रात एक लहानसे जाळे घेऊन उतरताना पाहिले आणि ते मासेमारी करत आहेत असं माझा समज झाला. मी पुलाच्या पायऱ्यांवरून खाली येऊन पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की ते लोक मासेमारी करत नव्हते, तर ते नदीच्या तळातून गाळ आणि चिखल उपसून जाळ्यात गोळा करत होते.

हे लोक खरतर स्वतःचा जीव धोक्यात घालून कृमी गोळा करणारे शहरातले लोक होते आणि ते प्रदूषित नदीवर उपजीविका करत होते. कृमी गोळा करणारे लोक ट्युबिफेक्स कृमी (ज्यांना स्लज वर्म असंही म्हणतात) गोळा करतात. हे कृमी ऑक्सिजन कमी असलेल्या आणिघन कचरा, सांडपाणी यापासून तयार झालेल्या गाळात आढळतात. हे कृमी सुकवून किंवा धुवून मत्स्यालयात ठेवण्यासाठी विकले जातात. सुकवलेले कृमी मत्स्यालयांना साधारण ४०००- ५००० रुपये प्रती किलो दराने विकले जातात पण तरीही ते गोळा करणाऱ्या लोकांना जेमतेम एका दिवसाची मजुरी मिळते.

मच्छीमार

जाळे टाकून माशांची वाट बघत बसलेले मच्छिमार. जेव्हा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो तेव्हाच अशा प्रकारची मासेमारी शक्य होते. मच्छिमार लोक काही वेळ मासे पकडून थोडा भाग घरी स्वयंपाकासाठी ठेवतात आणि उरलेले मासे बाजारात नेऊन विकतात.

दिवसाचा झेल

‘मागुर’ (Clarias batrachus किंवा चालता कॅट फिश). हा मासा कमी ऑक्सिजन असलेल्या अत्यंत दूषित पाण्यातही जगू शकतो. मच्छिमाराने आपल्या मुलाला व्हिडीओ कॉल करून हा मासा दाखवताच त्याचा आनंद ओसंडून वाहू लागला.

भाजीपाला गोळा करणे

आजी आणि नातू नदीच्या किनाऱ्यावरून ‘घोळ’ भाजी (Portulaca oleracea) आणि ब्राह्मी वनस्पती (Bacopa monnier) गोळा करताना. ते या गोष्टी स्थानिक बाजारात विकतात. या भाज्या पावसाळी असल्यामुळे हा व्यवसाय ठराविक ऋतुंमध्ये होतो. दोन्ही भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पाण्यात म्हशी

पाणम्हशीनां त्यांचे नावाप्रमाणे पाणी फार आवडते. मुठा नदीत, तो त्यांचा स्वतःचा तरणतलाव असल्याप्रमाणे त्या पाणी आणि चिखलाने अंघोळ करतात. पशुपालक म्हशींना नदीकिनारी चरायला सोडतात आणि त्यांना नदीपात्रातील तलावात पोहायला देतात. जर नदी आणि नदीकिनारे नसतील तर पशुपालकांना गुरे चरायला सोडण्यासाठी कोणतीही जागा उरणार नाही.

मुठा नदीकिनारी होणारे डोहाळजेवण!

तरुण जोडप्यांनी मुठा नदीच्या किनारी डोहाळजेवणानिमित्त स्वतःचे फोटो काढून घेणे हे आश्वासक चित्र आहे. पावसाळ्यात, नदीपात्र आणि किनारा हिरवाईने नटतो आणि होतकरू प्रकाशचित्रकारांना संधी उपलब्ध करून देतो.

कीटक गोळा करणारे

अतिशय दूषित ठिकाणी ते जाळ्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन नदीत उतरतात. ते नदीमध्ये उतरून तिच्या तळाला असलेल्या चिखलाला चाळून तो चिखल एका घाण बेटावर पसरतात आणि त्यातील ट्युबीफ्लेक्स कीटक पकडतात.

नदीतून बाहेर आलेला आणि घरांमध्ये शोभेची वस्तू होण्यासाठी मध्यस्थांकडे आणि वस्तूसंग्रहालयामध्ये जाण्यासाठी सुसज्ज झालेला ट्युबीफ्लेक्स कीटकांचा साठा.