tracing_lost_water_banner
Final-map-Pune-confluence2_IC_Sati-Asra
story
02
/11

हरवलेल्या पाण्याचा मागोवा

टेकड्या व फिरस्ते समुदाय
द्वारा - विजया श्रीनिवासन, मीनल सगरे & निरंजन गर्दे
छायाचित्र संपादन - अनुजा चावडा आणि चलचित्र संपादन - हर्ष पांडे.

पुणे व परिसरातील डोंगररांगा आणि टेकड्या ह्या जलावर्तनातील अत्यंत महत्त्वाचे घटक. ह्या डोंगररांगा आणि टेकड्या पावसाच्या पाण्याला झेलत एकीकडे त्याखालील जलप्रस्तरांपर्यंत मुरवतात, तर दुसरीकडे आपल्या अंगाखांद्यांवर पाण्याला खेळवत झरे-नाल्यांमार्फत नद्यांपर्यंत पोहोचवतात. मध्याश्मयुगापासूनच दख्खनचे पठार व येथील डोंगररांगा आणि टेकड्या ह्या येथील फिरस्त्या समुदायांच्या भटकंतीचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. आजही येथे ह्या समुदायांच्या आदिम मागच्या खुणा शिल्लक आहेत. ह्या फिरस्त्या समुदायांचे येथील डोंगररांगा, टेकड्या व नदी-नाले ह्यांच्याशी असलेले सांस्कृतिक बंध त्यांच्या भटकंतीदरम्यान त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या लोकदैवतांच्या कथा-गाथांमध्ये आढळतात. ह्या कथा-गाथा म्हणजे ह्या समुदायांची अस्मिता, सांस्कृतिक मूल्ये, भूदृश्याच्या आठवणी आणि त्यांची पर्यावरणीय जाणीव ह्यांचे प्रतिबिंबच. आज जेथे शहरीकारणामुळे त्यांची ही लोकदैवते लुप्त होत आहेत, तेथे हीच लोकदैवते ह्या फिरस्त्या समुदायांच्या भावविश्वातून एकेकाळी साकारलेल्या पण हरवत चाललेल्या सांस्कृतिक जलदृश्याचा शोध घेणारे दुवेच ठरतात. हरवलेल्या ह्या पाण्याचा मागोवा घेणारी ही कथा 'डोंगरमाथा', 'खोरं' आणि 'गाठभेठ' ह्या तीन लघुकथांद्वारे छायाचित्र-निबंधाच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आली आह

प्रस्तावना

अनेक पिढ्यांपूर्वी, फिरस्त्या समुदायांनी दख्खनच्या पठारावर व त्याही पलीकडे, येथील डोंगररांगा, टेकड्या, नदी-नाले आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहांच्या आधाराने भटकंती केली. हे फिरस्ते समुदाय, त्यांच्या भटकंतीदरम्यान त्यांना साथ देणारी त्यांची लोकदैवते, आणि त्यांचे सांस्कृतिक भूदृश्य ह्यांची ही कथा. प्रामुख्याने गुरांसाठी पाणी आणि रानचराईसाठी पूरक भौगोलिक परिस्थितीच्या शोधात घडलेली ह्या समुदायांची भटकंती, आणि त्यानिमित्ताने दरसाल पर्जन्यजन्य पश्चिममाथ्यावरुन पूर्वेकडील गवताळ प्रदेशाकडे केली जाणारी मोसमी स्थलांतरे ह्यांतून हे सांस्कृतिक भूदृश्य साकारले. आदिम फिरस्त्या समुदायांच्या मोसमी स्थलांतरानी ह्या सांस्कृतिक भूदृश्याची संरचना मांडली गेली. पुणे व परिसरातील डोंगररांगा व टेकड्या ह्या मोसमी स्थलांतरांचे अविभाज्य घटक होत.

पुणे परिसरातील डोंगररांगा आणि टेकड्या ह्या जलवर्तनातील अत्यंत महत्त्वाचे घटक. ह्या डोंगररांगा आणि टेकड्या पावसाच्या पाण्याला झेलत एकीकडे त्याखालील जलप्रस्तरांपर्यंत मुरवतात, तर दुसरीकडे आपल्या अंगाखांद्यांवर पाण्याला खेळवत झरे-नाल्यांमार्फत नद्यांपर्यंत पोहोचवत पाण्याचे विस्तृत जाळे विणतात. धनगर, गवळी, कातकरी, कोळी, भोई यांसारखे फिरस्ते समुदाय, तसेच वेताळ, म्हसोबा, तुकाई, साती आसरा, भिवाई आणि धुळोबा ह्यांसारखी त्यांची लोकदैवते, आणि त्यांच्या मोसमी स्थलांतरांच्या खुणा आजही ह्या टेकड्यांवर सापडतात.

ह्या फिरस्त्या समुदायांच्या उपजीविकेच्या पद्धती, लोककथा, पुराणकथा आणि रीतिरिवाज ह्यांत प्रतिबिंबित होणारे त्यांचे पर्यावरणाशी असलेले भावबंध ह्यांची ही कथा. परिणामी ही कथा ह्या समुदायांच्या पर्यावरणीय जाणिवेवर प्रकाश टाकते. ही कथा डोंगररांगांवर, टेकड्यांवर (डोंगरमाथा) आणि त्यांच्या उतारावर, पायथ्याशी (खोरं) वास्तव्य करणाऱ्या लोकदैवतांच्या कथा-गाथांद्वारे सादर करण्यात आली आहे.

डोंगरमाथा

ह्या कथेची सुरुवात म्हस्कोबा, म्हातोबा अथवा म्हसोबा ह्या भटकंती करणाऱ्या लोकदैवतापासून होते. ‘क्षेत्रपाळ’ म्हणून प्रेमाने संबोधला जाणारा हा देव अनेकदा डोंगराळ भूमीवर विश्रांती घेताना दिसतो. इतर प्रसंगामध्ये, तो टेकडीवरून खाली येतो आणि पायथ्याशी राहणाऱ्या लोकदैवतांशी संवाद साधतो. तर काही वेळा तो नद्यांच्या काठावर वास्तव्य करणाऱ्या साती आसरांचा (सात बहिणी) संरक्षक होतो. काही ठिकाणी तो जोगुबाईशी लग्न करून स्थायिक होतो (उदा. वाकड आणि कोथरूडमधील म्हातोबागड). तो प्राधान्याने माळरानावर खुल्या अवकाशाखाली वास्तव्य करतो, तर काहीवेळा मंदिरातही असतो. त्याला बळी म्हणून कोंबडी किंवा बकरी आवडते, आणि सणांच्या निमित्ताने त्याची पूजाअर्चा केली जाते.

Hill Lands of Pune Region
पुणे व परिसरातील टेकड्यांचा प्रदेश .

हिंजवडी-वाकड येथील म्हातोबा फिरस्त्या समुदायांबरॊबर भटकंती करत कोकणातून, प्रथमतः चासकमान येथे आला. तेथून तो ताम्हणी घाटातील बारपे येथे प्रवास करीत हिंजवडीच्या टेकडीवर पोहोचला. चासकमान येथून येताना तो हिराई आणि सीताई या दोन बहिणींना आपल्याबरोबर घेऊन आला. पाण्याची कमतरता भासल्यामुळे म्हातोबाने त्याचा विश्वासू भक्त जांभूळकरांना त्याला पाण्याजवळ आणण्याची विनंती केली. त्याप्रमाणे म्हातोबाला वाकड येथे मुळा नदीच्या काठावर आणण्यात आले. इथे जोगुबाईशी लग्न करून म्हातोबा वाकडला स्थायिक झाला. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला (हनुमान जयंती, मार्च-एप्रिल) म्हातोबा उत्सवाचा एक भाग म्हणून मिरवणुकीच्या दरम्यान म्हातोबाची पालखी हिंजवडी येथील मंदिरातून खाली वाकड येथील मंदिरामध्ये नेली जाते. ही पालखी म्हातोबाच्या हिंजवडी ते वाकड ह्या प्रवासाची आठवण आजही कायम करते.

कोकणापासून वाकडपर्यंतचा म्हातोबाचा प्रवास.

पत्नी जोगुबाईच्या आक्षेपावरून, म्हातोबाने आपल्या बरोबर आणलेल्या हिराई आणि सीताई ह्या दोन बहिणींना गावाच्या वेशीबाहेर मुळा नदीत बुडवले. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले कोळी आणि परीट यांनाही म्हातोबाच्या आदेशानुसार मुळा नदीत बुडवण्यात आले. बुडालेल्या बहिणी मुळेच्या काठावर पुन्हा प्रकट झाल्या, जिथे आज त्यांचे मंदिर आहे.

हिंजवडी येथील हिराई-सीताईचे मंदिर.

पुढे हाच म्हातोबा हिंजवडीहून कोथरूडजवळच्या म्हातोबागडावर सुतारदऱ्यातील त्याच्या बहिणीला -तुकाईदेवीला भेटायला आला. येथे ही तुकाईदेवी आज शहरीकरणाच्या गराड्यात हरवली आहे. शेतकरी समुदायांनी त्याला म्हातोबागडावरून खाली कोथरूड गावामध्ये आणले. येथे त्याला कोथरूड गावाच्या ग्रामदैवताचा मान दिला गेला. ह्या प्रवासात त्याच्यासोबत पत्नी जोगुबाईही होती. येथेही दरवर्षी चैत्र पौर्णिमेला (हनुमान जयंती, मार्च-एप्रिल) म्हातोबा उत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवाचा एक भाग म्हणून मिरवणुकीच्या दरम्यान म्हातोबाची पालखी म्हातोबागडावरून खाली कोथरूड गावठाणातील मंदिरामध्ये नेली जाते. ही पालखी म्हातोबाच्या म्हातोबागड ते कोथरूड गाव ह्या प्रवासाची आठवण आजही कायम करते. पूर्वी या म्हातोबा मंदिराजवळ एक नाला वाहत असे.

हिंजवडी ते म्हातोबागडपर्यंतचा म्हातोबाचा प्रवास.
म्हातोबागडाकडे जाण्याचा मार्ग.
म्हातोबागड येथील म्हातोबा आणि जोगुबाई.
कोथरूड गावठाणातील ग्रामदैवत म्हातोबा.

म्हसोबाच्या भटकंतीतून फिरस्त्या समुदायांनी अन्न, पाणी आणि रानचराईच्या शोधात केलेल्या मोसमी स्थलांतरांचा मागोवा घेता येतो. उदा. सुपे ते बोपगाव दरम्यान धनगरांनी निवडलेल्या कर्‍हा नदी आणि तिची उपनदी चांबळी ह्यांच्या काठाचा मार्ग.

सुपे ते बोपगाव दरम्यानचा धनगरांचा प्रवास.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुपे गावात राहणारे धनगर आपल्या शेळ्या-मेंढ्यासह सुपे ते बोपगाव असा प्रवास करतात. पावसाळा सुरू होईपर्यंत ते बोपगावमध्येच राहतात. त्यानंतर ते संपूर्ण पावसाळ्यात स्वतःच्या शेतीची मशागत करण्यासाठी सुपे गावी परततात. ते दरवर्षी चैत्र अमावास्येला (मार्च-एप्रिल) त्यांच्या समाजातील इतर मंडळींबरोबर ह्याच मार्गावरील हिवरे येथील म्हसोबाच्या जत्रेमध्ये सामील होतात. हिवरे येथे म्हसोबा कऱ्हा नदी आणि मावलायांच्या ओढ्याच्या संगमावर स्थित आहे. म्हसोबाच्या जत्रेच्या शुभारंभाचा मान या भागातील धनगर समाजाला दिला जातो. येथे संगमाजवळ साती आसरांचेही वास्तव्य असून त्यांना येथे ‘मावलाया’ (माऊलीचे अनेकवचन) असे संबोधले जाते. कऱ्हा नदीला समांतर होणारे धनगरांचे हे मोसमी स्थलांतर म्हणजे, फिरस्त्या समुदायांच्या पूर्वजांनी केलेल्या कऱ्हा नदीच्या खोऱ्यातील भटकंतीच्या जाळ्याचाच एक भाग.

बोपगावच्या वाटेवर धनगर कुटुंबाची छावणी.
सासवडजवळील हिवरे येथील मावलाया.
सासवडजवळील हिवरे येथील म्हसोबा.

म्हातोबाप्रमाणेच, वेताळ हे आणखी एक लोकदैवत. ‘भूत’ म्हणून परिचित असलेला वेताळ सहसा गावाच्या हद्दीबाहेर वास्तव्य करतो. म्हातोबाप्रमाणेच धनगर समुदाय वेताळाचीही पूजाअर्चा करतात. पुण्यामध्ये वेताळबोवाच्या टेकडीवर पाच गावांच्या वेशीबाहेर (कोथरूड, बावधन, पाषाण, भांबुर्डा आणि एरंडवणे) उंच पठारावर तो राहतो. त्याचा धाकटा भाऊ छोटा वेताळ ह्याच टेकडीच्या पायथ्याशी आहे.

वेताळबोवाची टेकडी (वेताळ टेकडी).

वेताळबोवाच्या टेकडीवर केंद्रस्थानी बसलेला वेताळबाबा आणि त्याच्याभोवती काही अंतरावर बसलेले त्याचे चेले/ राखणदार /शिपाई /गोटे ह्या जागेचे रक्षण करतात. टेकडी चढण्यासाठी असमर्थ असलेल्या आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी वेताळबाबा टेकडीच्या माथ्यावरून उतरून पायथ्याशी रामोशीवाडीजवळ दोन ओढ्यांच्या संगमावर आणखी एक विश्रांती घेतात. येथे, त्यांना प्रेमाने ‘छोटा वेताळ’ किंवा ‘श्री वेताळ महाराज’ संबोधले जाते. तसेच त्यांना रामोशीवाडीच्या ग्रामदैवताचा मान दिला आहे. छोटा वेताळचे विश्रांतीस्थान हे पाण्याचे खात्रीशीर स्त्रोत व सावलीवजा ठिकाणी असल्यामुळे बहुधा धनगरांच्या छावणीची जागा सूचित करते. आता मात्र हे पाण्याचे स्त्रोत शहरीकरणामुळे लुप्त झाले आहेत. ह्या वेताळबाबांचा उत्सव फाल्गुन अमावस्येच्या मध्यरात्री (गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला, मार्च-एप्रिल) साजरा केला जातो. ह्या उत्सव दरम्यान वेताळबाबांची पालखी टेकडीवरील मंदिरातून पायथ्याच्या मंदिरापर्यंत आणली जाते. ही पालखी वेताळबाबांच्या टेकडीच्या माथ्यावरून पायथ्याच्या विश्रांतीस्थानापर्यंतच्या प्रवासाची आठवण आजही कायम करते.

वेताळ टेकडीवरील वेताळबाबा मंदिर.
रामोशीवाडी येथील श्री वेताळ महाराज मंदिर.

खोरं

नद्यांच्या खोऱ्यातील ही कथा लोकदेवता साती आसरा म्हणजेच नद्या, विहिरी, हौद आणि इतर जलास्रोतांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सात बहिणींची आहे. साती आसरा आणि त्यांचे विशिष्ट अवतार प्रामुख्याने कोळी, भोई आणि कातकरी यांसारख्या नद्या-नाल्यांवर उपजीविकेसाठी निर्भर असलेल्या समुदायांशी निगडीत आहेत. या देवता ‘कोऱ्या सुवासिनी’ (विवाहित पण पती नसलेल्या) आणि ‘माहेरवाशिणी’ असतात. त्या जिथे राहतात ते ठिकाण त्यांचे माहेर मानले जाते. त्या प्रामुख्याने नदीकाठावरील खडकांच्या रूपात वास्तव्य करतात, तर कधी सात तांदळ्यांच्या (उभट खडे) स्वरुपात देवळामध्ये देखील राहतात. या सात बहिणींच्या सोबत म्हसोबा त्यांचा संरक्षक म्हणून नेहमीच आढळतो.

विविध जलास्रोतांतील साती आसरांचे वास्तव्य त्या त्या ठिकाणांचे पर्यावरणीय महत्त्व सूचित करतात. जसे की नद्यांमध्ये त्या जिथे वास्तव्य करतात तिथे डोह अथवा जिवंत झरे आढळतात, तसेच जनुकीय साठा (gene pool) आणि माशांच्या विविध प्रजातींसाठी पूरक परिस्थिती असल्याचे दिसून येते. अश्या ठिकाणी कोळी, भोई आणि कातकरी यांसारख्या मासेमारी हा मुख्य व्यवसाय असणारे समुदाय नांदतात. नदीच्या पात्राचे स्वरूप, प्रवाहाची दिशा, माशांचे प्रकार, माशांची पोहण्याची दिशा आणि त्यांचे ऋतुअनुसार बदल यानुसार मासेमारीच्या पद्धती, वेळा आणि जाळी लावण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.

पुणे परिसरातील मुळा नदी.

कातकरी समुदाय हे मूळचे डोंगरांवर राहणारे असले तरी मासेमारीच्या निमित्ताने त्यांनी सपाट मैदानी भागात नदीकाठी स्थलांतर केले. उदाहरणार्थ, हिंजवडी येथे कातकरी समुदाय मुळा नदीच्या काठी, तसेच नदी पात्रात वस्ती करून राहताना दिसतात. ह्या वस्तींच्या आसपास नदीपात्रामध्ये साती आसरांचे वास्तव्य अधिक प्रमाणात दिसून येते. त्यांचे हे प्रमाण नदीच्या परिसंस्थेची येथील समृद्धता दर्शविते.

हिंजवडी येथे मुळा नदीत मासेमारी करणारा कातकरी.

पुढे नदीच्या प्रवाहाच्या दिशेला म्हाळुंगे येथे साती आसरांची तीन ठिकाणे नदीकाठी थोडी विखूरलेली दिसतात. ही तिन्ही ठिकाणे मासेमारीसाठी अनुकूल ठरलेली आहेत. म्हाळुंगे व आजूबाजूच्या गावातील भोई मंडळी येथे मासे पकडण्यासाठी येतात. येथे भोई तरंगण्यासाठी रबर टायर, तर मासे पकडण्यासाठी जाळीचा वापर करतात. रोहू, चिलापी, कानोशी, मृगल आणि तांबरा हे मासे येथे पकडले जातात.

म्हाळुंगे येथे भोई व्यक्ती मासेमारीची तयारी करताना.

शहराच्या मध्यवर्ती भागात मुठा नदीच्या संदर्भात, नदी प्रदूषणामुळे साती आसरा आणि मासेमारी समुदायांचे पारंपरिक नाते पुसट झालेले आहे. कसबा पेठेतील भोई गल्लीत या नात्याला पूर्णतः तडा गेलेला दिसून येतो. येथे साती आसारांच्या नदीपात्रातील खडकाचे अस्तित्त्व, काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या नदी चॅनेल प्रकल्पादरम्यान नाकारण्यात आलेले आढळते.

कसबा पेठेतील भोई गल्लीजवळील साती आसरा.

शहरातील नदीच्या प्रदूषणामुळे भोई गल्लीतील भोईं मंडळींनी पुणे शहराच्या बाहेरील भूगाव, भुकूम, कात्रज, गराडे धरण आणि भिगवण यांसारख्या नवीन ठिकाणी मासेमारी सुरु केली आहे. ह्या नव्या ठिकाणी उपजीविकेच्या व्यवहारांची नित्यता साधलेली असली तरी साती आसरांशी असलेला संबंध मात्र निर्माण केलेला दिसत नाही.

पुरंदर येथील कऱ्हा नदीवरील गराडे धरणाजवळ भोई मच्छिमार.

ह्या विरुद्ध, आणखी एका प्रसंगात शहराच्या मध्यवर्ती भागात मुठा आणि मुळा नद्यांच्या संगमावर होणारी मासेमारी आता बंद असली तरीही साती आसरांचे धार्मिक महत्त्व मात्र टिकलेले आहे.

मुळा- मुठा नद्यांचा संगम.
मुळा-मुठा संगमावरील साती आसरा आणि म्हसोबा.

गाठभेट

बारामतीजवळील कांबळेश्‍वर येथे, नीरा नदीच्या वळणावर, कोळी समाजाची देवता भिवाई आणि धनगर समाजाचा देव धुळोबा या दोन ग्रामदेवतांची गाठभेट होते. लोककथेनुसार, कांबळेश्‍वरपासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळदेव येथे स्थित तिच्या भावाला- धुळोबाला भेटण्यासाठी भिवाई पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठावर (म्हणजे बारामतीच्या बाजूहून फलटणच्या बाजूला) आली आहे. भिवाई (एकवचन) किंवा साती आसरांसारख्या भिवाया (बहुवचन), या देखील नदीशी संबंधित लोकदेवता आहेत, आणि त्यांनादेखील ‘कोऱ्या सुवासिनी’ मानले जाते.

कांबळेश्‍वरची वार्षिक भिवाई जत्रा माघ पौर्णिमेला (जानेवारी-फेब्रुवारी) होते. दरवर्षी चैत्र एकादशी ते चैत्र पौर्णिमेदरम्यान (मार्च-एप्रिल) या वार्षिक उत्सवात भिवाई आणि धुळोबा या दोघांची पूजाअर्चा केली जाते. या उत्सवादरम्यान “भिवाईचा मुखवटा” (टाक) पालखीमधून धुळदेव येथील धुळोबाच्या भेटीस नेला जातो.

बारामतीजवळ कांबळेश्‍वर येथील नीरा नदी.

येथे वळणावर नदीपात्रात डोह असल्यामुळे नदीप्रवाह शांत आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, ह्या डोहामुळे येथे चिलापी, सोनी मागुर, तांबरा, खवला, गुगली, चिमटा अशा माशांच्या विविध स्थानिक प्रजातींच्या प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे. या माशांना देवीचे मासे अशी सर्वमान्यता मिळाल्यामुळे ह्या डोहामध्ये मासेमारी निषिद्ध आहे.

कांबळेश्‍वर येथे नदीच्या दोन्ही काठांवर भिवाई तिच्या मंदिरात वास्तव्य करते. तिथे तिच्या रक्षणासाठी चार-चार राखणदार आहेत. मुख्य मंदिराजवळील कुंडात स्नान करण्यासाठी ती दररोज बाहेर पडते. ह्या मंदिरापासून जवळच सती आसरा आणि म्हसोबाची छोटेखानी देवळे आहेत. येथील ह्या लोकदैवतांचे अस्तित्व भिवाईचा त्यांच्या कुळात झालेला समावेश दर्शवतात.

भिवाईच्या मुख्य मंदिराजवळील राखानदारांची छोटी मंदिरे.
Cluster of Rakhandars next to Bhivai Temple
भिवाईचे मुख्य मंदिर व कुंड.

दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास (ऑक्टोबर महिन्यात) महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या राज्यांतून धनगर समुदाय मोठ्या संख्येने कांबळेश्‍वर येथे भिवाई देवीच्या दर्शनासाठी येतात.

दर्शनाच्यावेळी नीरा नदी आणि भिवाई देवी यांची हळदी-कुंकू, हिरवा चुडा, आणि खणा-नारळाने ओटी भरली जाते.

नीरा नदी आणि भिवाई देवी यांची ओटी सुवासिनी भरतात.

भिवाई देवी साती आसरांप्रमाणेच सृजनाची देवता मनाली गेली असून ती नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. येथे नवदांपत्यांच्या सुखी संसारासाठी तसेच पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलला जातो.

नवस पूर्ण झाल्यावर धनगर समुदायातील मंडळी नवस सोडण्यासाठी म्हणून भिवाई देवीच्या दर्शनास पुन्हा येतात. येथे नवस सोडण्याचा विधी नीरा नदीच्या पाण्यात परडी सोडून केला जातो. परडी सोडण्याच्या विधिदरम्यान नीरा नदीला वाहण्यात येणारा प्रसाद एका लाकडी तराफ्यावर -परडीवर ठेवून त्याची पूजा केली जाते. तर नवसाच्या मुलाला ह्याच परडीवर बसवून त्याला नदीमध्ये आंघोळ घातली जाते. हा परडी सोडण्याच्या विधीचा मान कोळी समाजाला देण्यात आला आहे. नीरा नदीला वाहिलेल्या सर्व प्रकारच्या प्रसादांवर कोळी मंडळींचा अधिकार असतो. एकेकाळी आपले शेळ्या-मेंढ्यांचे कळप वृद्धिंगत व्हावेत ह्या इच्छेने धनगर समुदाय नदीच्या पाण्यात मेंढी सोडून भिवाई देवीला अर्पण करत असत. अश्याप्रकारे वाहिलेल्या मेंढ्या नंतर कोळी मंडळींच्या होत असत.

‘परडी सोडणे’ या विधीचा व्हिडिओ.

कांबळेश्‍वर येथे भिवाई देवीचा शेंदूर लावलेल्या स्वयंभू मूर्ती ते साकार मूर्तिरूप हा काळाच्या ओघात घडलेला प्रवास दिसतो.

कांबळेश्‍वर येथील फलटणच्या बाजूला नीरेकाठी असलेले भिवाई देवीचे मंदिर.
फलटण जवळील धुळदेव येथील भिवाया.
कांबळेश्‍वर येथील बारामतीच्या बाजूला नीरेकाठी असलेले भिवाई देवीचे मंदिर.
भिवायांची मूर्ती, आणि भिवाई व धुळोबाचे मुखवटे.

वाटचाल

वरील सर्व उदाहरणांमध्ये, दूरवरच्या विविध ठिकाणांमधली नाती प्रामुख्याने फिरस्त्या समुदायांच्या भटकंतीद्वारे तयार झालेली आढळतात. ही नाती ह्या समुदायांच्या कथा-गाथा, कलाकृती व प्रतिमांमध्ये प्रसंकेतिक झालेली दिसतात.

परंतु पुण्यातील बावधन येथील साती आसरा, म्हणजे समुदाय, भूगोल आणि लोकदैवते ह्यांचे समुदायांच्या भावविश्वातून साकारलेल्या नात्याच्या नवीन आवर्तनाची सुरुवात. ही साती आसरा सोलापुरातील निमगाव येथून स्थलांतरित झालेले दादा मराठे यांच्या बावधन येथील निवासस्थानाच्या अंगणात वसलेली आहे. येथील साती आसरांची कहाणी निमगाव येथून सुरू होते. दादा मराठे यांचे काका -तात्याबा मराठे एकेदिवशी बेपत्ता झाले. काही दिवसांनी ते जवळच्या विहिरीतून साती आसरांसोबत बाहेर आले. ह्या घटनेनंतर घरातील मंडळींची अशी मनोधारणा झाली की काकांना साती आसरांनीच वाचविले व परत आणले. ह्या श्रद्धेपोटी दादा मराठे यांचे वडील -सयाजी मराठे ह्यांनी साती आसरांची घरातील देवघरामध्ये सात तांदळाच्या स्वरूपात स्थापना केली. त्यानंतर, त्यांच्या कुटुंबात सर्वच शुभकार्याचा प्रारंभ साती आसरांच्या पूजेने करण्याची रीत पडली. जसे की घरातील कोणत्याही लग्नकार्याची सुरुवात “जळ आणणे” ह्या विधीने केली जाते. ह्या विधी दरम्यान भीमा नदीतून सात कुमारिकांद्वारे वाजत गाजत पाणी आणले जाते व त्याच पाण्यात अन्न शिजवले जाते. गावकऱ्यांना जेवण देण्यापूर्वी सात कुमारीकांची पूजा करून त्यांना प्रथम जेवण दिले जाते. जेंव्हा दादा मराठे शिक्षणासाठी व रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झाले तेंव्हा त्यांच्या वडिलांनी ह्या साती आसरांना आपल्याबरोबर आणले. त्यांची ही श्रद्धा आता निमगाव आणि पुणे यांना जोडते.

निमगाव येथील घरातील तांदळा स्वरुपातील साती आसरा व बावधन येथील देवळातील मराठे कुटुंबीयांनी निवडलेले नदीच्या लोकप्रिय प्रतिमांवर आधारित साती आसरांचे साकार मूर्तिरूप.

समारोप

फिरस्ते समुदाय, त्यांची लोकदैवते आणि डोंगर-खोऱ्यांतील त्यांच्या भटकंतीच्या ह्या कथा भूगोल, संस्कृती आणि मिथके ह्यांच्या मिलापातून होणाऱ्या स्थलनिर्मितीवर प्रकाश टाकते. ह्या समुदायांच्या मोसमी स्थलांतरांदरम्यान त्यांच्या सोबत भटकंती करणाऱ्या त्यांच्या लोकदैवतांनी निसर्गाच्या प्रतिकूल अनुभवांमध्ये त्यांना भावनिक स्थैर्य दिले. आज जेथे शहरीकारणामुळे ही लोकदैवते लुप्त होत आहेत, तेथे हीच लोकदैवते ह्या फिरस्त्या समुदायांच्या भावविश्वातून एकेकाळी साकारलेल्या पण हरवत चाललेल्या सांस्कृतिक जलदृश्याचा शोध घेणारे दुवेच ठरतात.

References

  • Feldhaus, A. 2003. Connected Places – Religion, Pilgrimage and Geographical Imagination in India. Palgrave Macmillan, New York.

  • Glushkova, I., and Feldhaus, A.1998. Goddesses and Domestic Realm in Maharashtra. Pp.73-81 in Glushkova, I., and Feldhaus, A. (eds.): House and Home in Maharashtra. Oxford University Press, Delhi.

  • Gunther-Dietz Sontheimer. 1989. Pastoral Deities in Western India. Oxford University Press, New York, 276.

  • Kosambi D.D., 1962. Myth and Reality – Studies in the Formation of Indian Society. Popular Prakashan, Bombay.