Peshwa Aqueducts Story Cover Image
Aqaducts
story
08
/11

पेशवेकालीन जलवाहिनी

पायाभूत गरजेवरचा समन्वित तोडगा
द्वारा - पल्लवी गोखले
१८ व्या शतकामधील पेशवेकालीन पुण्याची पाणीपुरवठा प्रणाली ही अनुकरणीय अभियांत्रिकी, प्रशासन व नगररचनेचे एक आदर्श उदाहरण आहे. हौद, उच्छवास व मानवनिर्मित भुयारी जलवाहिनी (नळ/नहर) हे या पाणीपुरवठा व्यवस्थेचे भाग होते. अगदी हल्लीच्या काळापर्यंत यातील काही भाग कार्यक्षम होते. २० कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे जाळे आणि एकूण २०० पेक्षा जास्त ठिकाणी हौद किंवा उच्छवास असलेली ही भव्य प्रणाली पुण्याच्या समृद्ध जल वारशाचा भाग आहे. परंतु गेल्या काही दशकांत घडलेल्या शहरीकरणामुळे या प्रणालीचे अनेक भाग व्यर्थ सोडून देण्यात आले आहेत अथवा नष्ट करण्यात आले आहेत. या प्रणालीचा संपूर्ण अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी या आभासी प्रदर्शनामध्ये द्विमितीय आणि त्रिमितीय डिजिटल पुनर्रचना तयार करण्यात आली आहे.

एका छोट्याशा नदीकाठच्या गावापासून ते भारताच्या आयटी-एज्युकेशन हबपर्यंत

पुणे आज बाणेर, पाषाण, औंध, डेक्कन, एरंडवणे, कोंढवा, खराडी, सहकारनगर, धनकवडी आणि मुळा-मुठा नद्यांच्या संगमाभोवती पसरलेल्या इतर अनेक परिसरांनी ओळखले जाते.

८०-९० च्या दशकातील एक शाळकरी मुलगी म्हणून माझ्यासाठी पुणे पेठांमध्ये पसरले होते. पेठ म्हणजे सध्याचे वॉर्ड्स किंवा परिसर जे पेशव्यांच्या काळापासून किंवा त्याहून पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. घर शुक्रवार पेठेत, शाळा सदाशिव पेठेत, मित्रमैत्रिणी शनिवार पेठेत, नातेवाईक नारायण पेठेत, खरेदी रविवार पेठेत आणि शनिवार-रविवारी सकाळी पर्वतीला जाणे ! आयुष्य सोपे होते. या छोट्याशा दुनियेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आलेले पत्र माझ्या शुक्रवार पेठेतल्या घरी, फक्त एका ओळीच्या पत्त्यावर सहज पोहचू शके — काळ्या हौदाच्या समोर!

पुण्याच्या आजच्या सर्वांत मौल्यवान वारशाशी माझी पहिली भेट!

मला आठवते की दर उन्हाळ्यात पुणे महानगरपालिका नियमित पाणीकपात सुरू करत असे. पाणीटंचाई नेहमीच व्हायची. लहानपणी मी रस्ता ओलांडून आमच्या मोलकरणीच्या मदतीने काही बादल्या पाणी आणायचे. तेव्हा मी काळा हौद नावाच्या एका रहस्यमय छोट्या कुंडात डोकावायचे, आणि मला खूप मजा यायची. जेव्हा मी या कुंडाच्या फक्त २ फूट × २ फूट आकाराच्या तोंडातून खाली पाहायचे तेव्हा मला जादू झाल्यासारखे वाटायचे— मी काही मीटर खोल स्वच्छ पाणी पाहू शकत होते, जे रस्त्यावरील रहदारीला जवळजवळ समांतर वाहत होते.

काही वर्षांनंतर या माझ्या लहानपणीच्या ‘अभिमानास्पद आठवणी’मध्ये मी पुन्हा एकदा गुंतले पण यावेळी एक शैक्षणिक अभ्यास म्हणून. या कुंडाला त्याचे नाव मिळाले होते ‘काळे वावर’ वरून— एक खुला परिसर ज्याचे नाव त्याच्या काळ्या मातीवरून पडले. १७३० च्या सुमारास सरदार जिवाजीपंत खासगीवाले यांनी या परिसराचा विकास केला आणि त्याला शुक्रवार पेठ असे नाव दिले. परंतु ज्या कुंडातून पाणी आणण्याचा मला अभिमान होता तो फक्त एका मोठ्या प्रणालीचा एक छोटासा मेंटेनन्स शाफ्ट निघाला, ज्याला स्थानिक लोक उच्छवास किंवा डिपिंग वेल म्हणतात.

हरवलेला वारसा उलगडताना- नकाशांतून पुनर्जीवित करताना!

पुण्याच्या पाण्याच्या भूतकाळाच्या या वेधक कथांचा शोध घेताना माझ्यातील भूगोलशास्त्रज्ञाने या प्रवासाचे सुकाणू हाती घेतले! पेशवेकालीन पुण्यातून प्रवास करताना नकाशे हे माझे संसाधन, तंत्र, परिपाठ आणि परिणाम बनले! या प्रवासाची ही झलक.

पेशवेपूर्व काळातील पुण्याची मुळे

पुणे, आजच्या महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर हे मुळा-मुठा नद्यांच्या किनारी वसलेले एक छोटे खेडे होते. पुरातत्त्व पुराव्यांनुसार ही वसाहत सातवाहन काळापासून (~ इ.स.पू. २०० ते इ.स. २००) अस्तित्वात होती. शिलाहार राजा अपराजित याच्या १०व्या शतकातील ताम्रपटात पुणे हे ‘पुनक विषय’, म्हणजे ‘प्रमुख महत्त्व असलेले ठिकाण’ अशा नावाने ओळखले आहे.

पत्रांमधून भूतकाळ शोधताना.
जमिनीत भूतकाळ शोधताना. (छायाचित्र श्रेय : डॉ. सुषमा देव)

शहरी पुणे

पेशवा (फारसीमध्ये शब्दशः नेता) हे मराठा साम्राज्याच्या पंतप्रधानांना बहाल केलेले पदनाम होते. छत्रपती शाहूंनी १८व्या शतकाच्या सुरुवातीस बाळाजी विश्वनाथ भट यांची पहिले पेशवे म्हणून नेमणूक केली. १७१९-१७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र बाजीराव बल्लाळ, म्हणजेच पहिले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवेपद प्राप्त केले. १७२८ च्या सुमारास त्यांनी आपला तळ सासवडहून पुण्याला हलवलाआणि मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून पुण्याचा विकास केला. त्यानंतर पुणे हे सत्तेचे केंद्र बनले.

बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे एक द्रष्टे नेते होते. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आधुनिक नगरविकास विचारांची सुरुवात त्यांच्या कृतींमध्ये दिसून येते. पुण्याची ऐतिहासिक पेयजल पुरवठा व्यवस्था ही ऐतिहासिक काळातील सुंदर नियोजन आणि अंमलबजावणीचे एक गौरवशाली उदाहरण आहे.

शहरीकरणाचा इतिहास, नकाशांतून.

कनात म्हणजे काय आणि ते पुण्यात कसे आले?

(Source: Wikimedia Commons (2021, November 25) – Retrieved 05:40, January 7, 2022)

करेझ किंवा कनात किंवा नहर म्हणजे भूमिगत वाहिन्या ज्या भूगर्भातील प्रवाहांना किंवा विहिरींमधील पाण्याला जोडतात. हे पाणी नंतर त्या वाहिन्यांचा वापर करून पृष्ठभागावर उपलब्ध केले जाते. ही पद्धत पर्शियाहून अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान भागांतून भारताकडे मार्गक्रमण करत आल्याचे दिसते. या प्रणालीला देखभालीकरिता ठराविक अंतरावर शाफ्ट देखील केले जातात. भौगोलिक परिस्थिती आणि प्रादेशिक गरजांनुसार या प्रणालीचे वेगवेगळे प्रकार विविध प्रदेशांमध्ये वापरले गेले आहेत.

(Source: Wikimedia Commons (2021, January 29) – Retrieved 05:40, January 7, 2022)

भारतीय उपखंडात, सुलतानशाहीच्या आगमनामुळे पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महत्त्वाचा बदल झाला. पूर्वी वस्त्या पाण्याजवळ वसवल्या जात. पण सुलतानी काळात वस्त्यांमध्ये पाणी आणले जाऊ लागले. मध्ययुगीन भारतात या बदलांची सुरुवात मुख्यतः मुघल राजवटीत झालेली दिसते. करेझ किंवा कनात प्रणाली विजापूर, अहमदनगर, दौलताबाद, औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, बिदर आणि पुणे यांसारख्या सुलतानांचे अमलाखाली किंवा त्या प्रभावात असलेल्या ऐतिहासिक भारतीय शहरांमध्ये दिसतात. पुण्यातील जलवाहिन्यांचे काम सुरू होतअसताना, औरंगाबाद आणि अहमदनगरमधील अनुक्रमे मलिक अंबरने बांधलेल्या आणि निजामशाहीच्या अधिपत्याखाली असलेल्या यंत्रणा यशस्वी सेवेचे एक शतक पूर्ण करत होत्या. या ठिकाणी विहिरीतून पाणी घेतले जात होते. त्याच काळात बुऱ्हाणपूरमधील एक प्रणाली पर्शियन विद्वानांनी सातपुडा पर्वतरांगांच्या खोऱ्यातील भूजल पुनर्भरण क्षेत्राचा अभ्यास करून तयार केली होती. पुणे हे ऐतिहासिक शहर या प्रणालीचे प्रादेशिक रुपांतर आणि अंमलबजावणीचे एक उदाहरण आहे.

ऐतिहासिक कनात प्रणालीसह भारतीय शहरांची ठिकाणे

अंबिल ओढा वळवणे आणि भूमिगत नहर प्रणालीचे बांधकाम

पेशव्यांच्या राजधानीसाठी पुणे हे हवामान आणि राजकीयदृष्ट्या आदर्श ठिकाण होते. पण कात्रज डोंगरातून उत्तरेकडे वाहणाऱ्या आणि मुठा नदीत मिसळणाऱ्या अंबिल ओढ्याला वारंवार पूर येत असे. यामुळे त्याच्या काठावर वसलेल्या वस्त्यांमध्ये हाहाःकार उडत होता. कदाचित १८ व्या शतकादरम्यान या ओढ्याचा प्रवाह बदलण्यात आला.

याउलट, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी अनेक विहिरी असल्या तरी बारमाही विहिरींची संख्या फारच कमी होती. बहुतेक विहिरींत खारे किंवा खारट पाणी होते. पुणे नगर संशोधन वृत्त्तातील नोंदीनुसार, १८६४पर्यंत (जलवाहिनी प्रणाली सुरू झाल्यानंतर जवळजवळ एक शतक), १५०० पेक्षा जास्त विहिरींपैकी १०० हून कमी विहिरींमध्ये पिण्यायोग्य पाणी होते. १८८५ ची प्रशासकीय नोंद देखील या माहितीचे समर्थन करते.

प्रणालीचा जन्म

१७५० साली, नानासाहेब पेशव्यांनी शहराच्या दक्षिणेला सुमारे ६ ते ८ किमी अंतरावर कात्रज येथे दोन दगडी धरणांचे बांधकाम सुरू केले. धरणांमध्ये डोंगराच्या उतारावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी साचत होते. त्यांच्या तळाशी गोड्या पाण्याचे झरेही होते.

कात्रज येथे दगडी बांधकाम करून बांधण्यात आलेली दोन धरणे.

कात्रज धरणांच्या उत्तरेला मुठा नदीपर्यंत जवळजवळ १००+ मीटरचा मंद उतार होता. पाणलोट आणि झऱ्यांच्या पृष्ठभागावरून प्रवाहामुळे पहिल्या टाकीत पाणी साचे. गाळ खाली बसल्यावर ते दुसऱ्या टाकीत वाहून जाई. त्यानंतर ते स्थानिक पातळीवर नळ/नहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी बांधकामाच्या जलवाहिनीत नेले जाई. जलवाहिनी हा एक कमानदार बोगदा होता. तो जमिनीच्या पातळीपासून सुमारे २ ते ३ मीटर खाली होता. त्याची रुंदी सुमारे ८० सेमी आणि उंची सुमारे २ मीटर होती. यामुळे एखाद्या माणसाला संपूर्ण वाहिनीत आरामात चालता येत असे. हे पाणी शनिवार वाड्यात, म्हणजे पेशव्यांच्या निवासस्थानी आणि दरबारात आणले जाई आणि जास्तीचे पाणी मुठा नदीत सोडण्यात येई.

प्रणालीची सर्वोत्तम अवस्था!

ही व्यवस्था नगर नियोजन आणि विकासाचे एक निर्दोष उदाहरण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुपस्थितीत नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये दाखवलेली दूरदृष्टी लक्ष वेधून घेणारी आहे.

वाहिन्यांची रचना क्षेत्राच्या स्थलाकृतिशी, चढउतारांशी जुळवून घेत केली आहे.
aquaduct_map_slide_1

बहुतांश जलवाहिन्या रस्त्यांना समांतर आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल करणे सोपे झाले

aquaduct_map_slide_2

आपल्या वैभवशाली दिवसांमध्ये ही यंत्रणा तत्कालीन पुणे शहरातील निवासी क्षेत्राच्या ८०% पेक्षा जास्त भागांना २४ x ७ पिण्याचे पाणी पुरवण्यास सक्षम होती.

aquaduct_map_slide_3

जलवाहिन्या लाखो लिटर पाणी वाहून नेत आणि एवढा मोठा भार असूनही ही बांधकामे गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत अबाधित होती. कात्रज जलवाहिनीतून शहराला दररोज सुमारे २५ लाख लिटर पाणीपुरवठा होत असे.

aquaduct_map_slide_4

पेठ परिसरात जलवाहिन्यांच्या जाळ्याची लांबी २० किमी पेक्षा जास्त आहे.

aquaduct_map_slide_5

प्रणालीमध्ये नवीन भर- नवीन वस्ती क्षेत्र आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणे यासाठी केली गेली.

पुण्याच्या ऐतिहासिक पाणीपुरवठा प्रणालीचा परस्परसंवादी (इंटरऍक्टिव्ह) नकाशा

या व्यवस्थेची आजची परिस्थिती

गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे या ऐतिहासिक पाणीपुरवठा व्यवस्थेतील अनेक घटक दुर्लक्षित झाले आहेत किंवा पूर्णपणे नष्ट झाले आहेत. यामुळे प्रणाली अकार्यक्षम आणि निराश्रित झाली आहे. 20 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ती नियमित सार्वजनिक वापरात असूनही, या प्रणालीच्या वापराचे दस्तऐवजीकरण करण्यात मदत करणारी कोणतीही सूची किंवा नोंद महापालिकेने ठेवलेली नाही. या कारणास्तव आपण केवळ या प्रणालीचा वापर केलेल्या स्थानिक लोकांकडून माहिती समजून घेऊ शकतो.

काळाच्या पडद्याआड गेलेला काळा हौद.
सदाशिव पेठ हौद.
भाऊ महाराज बोळात कुठेतरी.

References

  • Bhagvat, S. & Bhagvat, R. Peshwekalin Panipuravatha Yojana (Marathi), – https://youtu.be/xldUKwTHGW8

  • Gokhale, P. & Prof. Deo S. (2016). ​Digital Reconstruction and Visualisation of Peshwa period water system of Pune. Heritage: Journal of Multidisciplinary Studies in Archaeology 4 : 2016 [ISSN 2347–5463]

  • Gokhale, P. (Unpublished 2015-2016) Creation of GIS based digital map for Maratha period Pune – Historic GIS, research project for Saṁvidyā Institute of Cultural Studies, Pune-India

  • Joglekar P. P., Deo S., Balkawade P., Rajaguru S. N., Deshpande-Mukherjee A. and Kulkarni A. N., (2006-07). A New Look at Ancient Pune through Salvage Archaeology (2004-2006). Bulletin of the Deccan College Research Institute Vol. 66-67, 211-225

  • Karve C. G., (ed), (1943). Pune Nagar Samshodhan Vrutta. Vol 2-4. Pune: Bharat Itihas Samshodhak Mandal

  • Karve C. G., (1942). June Haud (Marathi), pp 14 in Karve C. G., (ed.), 1942. Pune Nagar Samshodhan Vrutta. Vol 1. Pune: Bharat Itihas Samshodhak Mandal

  • Light R. E. H., (1869-72). City of Poona. Poona.

  • Mirashi, V. V., (1977). ‘Inscriptions of the Silaharas’ in Corpus Inscriptionum Indicarum, VI In: New Delhi: Archaeological Survey of India.
  • Poona City Survey, 1876.

  • Pune Municipal Corporation, 2013. Draft Development Plan For Old Pune City (2007 – 2027) Published U/S 26(1) Of Mr and Tp Act 1966. Accessed online at Indiaenvironmentportal

  • Pune Municipal Corporation, Revision Of Development Plan Sanctioned In 1987, As Tp1966 Section 38, Strategic Environmental Assessment Scoping Report. Accessed online here Pune Corporation

  • Gazetteers of Bombay Presidency, Poona District, Volume XVIII, Part III, 1885.

  • File:Insideqanat.JPG. (2021, November 25). Wikimedia Commons, the free media repository. Retrieved 05:40, January 7, 2022 from Wikimedia

  • File:Qanat cross section.svg. (2021, January 29). Wikimedia Commons, the free media repository. Retrieved 05:40, January 7, 2022 from Wikimedia

  • QGIS documentation accessed online at QGIS Documentation