प्रस्तावना
भारतातील इतर अनेक ठिकाणांप्रमाणे पुण्यात अनेक ऐतिहासिक विहिरी, टाक्या, तळी, शोभिवंत तलाव, व नहरी पाहायला मिळतात. यातील अनेक वास्तु आपल्या पूर्वजांच्या पारंपारिक ज्ञानाचे व कुशल जल व्यवस्थापनाचे प्रतिक आहेत.
प्रस्तुत चित्र-निबंध बारव या पारंपारिक वास्तुच्या संरचनेची कथा सांगतो. बारव म्हणजे थोडक्यात पाय विहीर किंवा विस्तारित कुंड. अनेक बारवांच्या तळाशी भूजलापर्यंत पोहोच्याकरिता एक कूप खणलेला दिसतो. या कुपातून वर येणारे पाणी चारही बाजूने टप्याटप्यात पायऱ्या असलेल्या बारवेत साठते. बारवा या बहुतांश वेळेला चौकोनी असतात , परंतु काही वेळा त्या आयताकृती अथवा अष्टकोनीदेखील असतात. साधारणपणे प्रत्येक बारवेभोवती एक संरक्षक भिंत असते व पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत जाण्यासाठी एक किंवा अधिक प्रवेश असतात. काही वेळेला संरक्षक भिंतीतून पाण्यात डोकावणारे सुंदर मंडप असतात. बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.
धर्मादाय कृत्यांद्वारे समाजाचे भले व्हावे व आपणास पुण्यप्राप्ती व्हावी, या कल्पनेने अनेक राज्यकर्त्यांनी, व्यापाऱ्यांनी, सावकारांनी, व धार्मिक गुरुंनी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी बारवांची निर्मिती केल्याचे दिसून येते. अशा धनिक लोकांच्या आर्थिक सहाय्यातून व सामान्यांच्या एकत्रित सहभागातून बारवा बांधल्या जात. त्या केवळ पाणी साठवण्यासाठी उपयोगी नव्हत्या तर सर्वसामान्यांसाठी व विशेषतः स्त्रियांसाठी भेतीगाठींचे ठिकाण होत्या.
पुण्यात आढळणाऱ्या बारवा
एके काळी, बारवा पुण्यातील अनेक वाड्यावस्त्यांचा आणि मंदिर परिसराचा अंगभूत भाग होत्या. आजही पुण्यातील काही गावांमध्ये सावली देणाऱ्या झाडाशेजारी बारव आढळते. इतरत्र, जरी बारवा कालांतराने नष्ट झाल्या असल्या तरी जुन्या पिढीतील लोकांमध्ये त्यांच्या स्मृती अबाधित आहेत. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील एका गावाला तेथे पूर्वी अस्तित्वात असलेल्या जुन्या बारवेच्या नावावरूनच ‘बारव’ असे नाव पडले आहे. थोडक्यात, बारवा अनेक वस्त्यांच्या अविभाज्य भाग होत्या.
ही कथा १४ व्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या सहाशे वर्षांहून अधिक प्राचीन, अशा दोन बारवांची आहे. त्यापैकी एक बारव आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात व दुसरी बारव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात आढळते. मंचर येथील बारव आजही लोक आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी वापरतात. लोणी भापकर येथील बारव एका मंदिर परिसराचा भाग असून तिला धार्मिक महत्व आहे. कालांतराने जरी तिचे पाणी घरगुती वापरासाठी अयोग्य झाले असले तरी ती अग्निजन्य बेसाल्ट खडकात घडवलेल्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
मंचर येथील बारव
आजचे मंचर शहर मध्ययुगीन काळात एक लहानसे गाव होते, जे पैठण (साड्यांसाठी प्रसिद्ध) आणि जुन्नर या ऐतिहासिक शहरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर वसलेले होते. मंचरच्या पश्चिमेकडील खर्डी नाल्याजवळ यापूर्वी वर्णिलेली बारव आपल्याला पाहायला मिळते. या बारवेच्या तळाशी असलेल्या नैसर्गिक झऱ्याद्वारे तिला अविरत पाणी पुरवठा होत राहतो.
मंचरची बारव चौरस आकाराची आहे, जिची वरील बाजू २२ मीटर असून, खालची बाजू जवळपास ११ मीटर आहे. तिला दक्षिणेकडून व पूर्वेकडून दोन प्रवेश आहेत. या दोन्हीतून खाली उतरल्यानंतर, आपण एका विस्तारित सोपानाशी पोहोचतो, जेथे बसण्यासाठी एक कट्टा आहे.
पायऱ्या हे या बारवेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. बरेच वेळा बारवेच्या पृष्ठभागावर जमिनीचा दाब आल्यामुळे तिच्या पायऱ्या पुढे सरकण्याची शक्यता उद्भवते. हे टाळण्यासाठी पायऱ्यांच्यामध्ये संरक्षक दगड बसवले आहेत, ज्यामुळे पायऱ्यांचे सरकणे टळते. हे संरक्षक दगड एक सुंदर आकृतिबंध तयार करतात व बारवेच्या सौंदर्यात भर पाडतात. पायरीसारख्या घटकाचा वापर कल्पकतेने करून वास्तुंचे सौंदर्यमूल्य कशाप्रकारे वृद्धिंगत होऊ शकते, याचे ही बारव एक उत्तम उदाहरण आहे.
बारवेच्या पश्चिमेकडील सरंक्षक भिंतीमधील शिलालेख तिच्या निर्मितीबद्दल एक मनोरंजक कथा सांगतो. या संस्कृत शिलालेखानुसार मणिचर (मंचरचे पूर्वीचे नाव) हे अमरगिरीच्या डोंगररांगांजवळ वसलेले एक सुंदर गाव होते. मणिचरमध्ये लादिदेव नावाचा एक सक्षम, न्यायी, शूर व देखणा तरुण राहत होता, जो गावाच्या पट्टेलवर्य अर्थात गावप्रमुखाचा मुलगा होता. एका रात्री लादिदेवच्या स्वप्नात पृथ्वी येते व त्याच्या गावात कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची इच्छा व्यक्त करते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर, लादिदेवला त्याचे स्वप्न आठवते. त्यानुसार गावातील एका सुयोग्य ठिकाणी तो बारव बांधण्याचा निर्णय घेतो. या बारवेमुळे मंचरच्या दुष्काळाग्रस्त ग्रामस्थांची पाण्याची सोय होईल, असा विचार तो करतो. त्यानुसार एक शुभ मुहूर्त काढून लादिदेव शके संवत १२६६ (इ.स . १३४४) रोजी बारवेच्या बांधकामाला सुरुवात करतो. (संदर्भ: मांडके, जी, २००३)
आज, मंचरची बारव लोकांमध्ये ‘अंघोळीची बारव’ म्हणून लोकप्रिय आहे. अनेक प्रौढ, तरुण आणि शाळेकरी मुले भल्यापहाटे आंघोळीसाठी बारवेपाशी जमतात.
एका लहान मार्गाद्वारे बारवेतील पाणी तिच्या पूर्वेकडे असलेल्या एका कुंडात साठते . या कुंडावर अनेक महिला दररोज कपडे धुण्यासाठी जमतात. ज्याप्रकारे, बारव ही पुरुषांसाठी एकत्र येण्याचे ठिकाण बनली आहे, त्याप्रमाणे कुंड हे महिलांसाठी दिवसभरातील व्यापातून दोन निवांत क्षण काढून एकमेकींशी गप्पागोष्टी करण्याचे ठिकाण बनले आहे.
लोणी भापकर येथील बारव
लोणी भापकर गावात १४ व्या शतकात बांधलेली एक सुंदर बारव आढळून येते. ही बारव एका मंदिर परिसराचा भाग आहे, ज्यात सध्या एक शिवमंदिर व एक दत्तमंदिर पाहायला मिळते. पूर्वी दत्तमंदिराच्या जागी एक विष्णूमंदिर अस्तित्वात होते. या दोन्ही मंदिरांच्या समोर पंक्तीबद्धरित्या बारव बांधली आहे, ज्याद्वारे तिचे महत्व व पवित्रता अधोरेखित होते. पूर्वी, धार्मिक विधींचा भाग म्हणून, लोकं बारवेमध्ये स्नान करून शूचिर्भूत होऊन मंदिरांमध्ये प्रवेश करायचे.
अग्निजन्य बेसाल्ट खडकातून घडवलेली ही बारव चौकोनी आकाराची आहे. वरील बाजूस तिचा विस्तार २१ x २१ मीटर असून, खालच्या बाजूस तो १४ x १४ मीटर होतो . बारवेला दक्षिणेकडून प्रवेश आहे, जेथून काही पायऱ्या उतरल्यावर आपण पहिल्या टप्प्याशी पोहोचतो. आकर्षक देवकोष्ट (कोनाडे) व मंडप, ही या बारवेची विशेषता आहे.
दोन मीटर उंची असलेली बारवेची संरक्षक भिंत जमीन व पाणी यांच्यातील हद्द अधोरेखित करते. या भिंतीच्या आतील बाजूस आपल्याला २४ सुंदर देण्कोष्ठ पाहायला मिळतात. पूर्वी या देवकोष्ठात विष्णूचे विविध अवतार दर्शवणाऱ्या मूर्ती ठेवल्या होत्या. या मूर्ती बारवेला एका पवित्र वास्तुचे स्वरूप प्रदान करीत असत व लोकांना तिचे पाणी प्रदूषित करण्यापासून परावृत्त करत. थोडक्यात, वास्तुकलेतील बारकाव्यांना धार्मिक कल्पनांची जोड देऊन, बारवेची स्वच्छता व पवित्रता राखली जाई.
चार वर्तुळाकार खांबांवर छताचा भार वाहणारा चौकोनी मंडप बारवेच्या पश्चिम संरक्षक भिंतीतून आत डोकावतो. एके काळी विष्णू मंदिरीच्या बाहेर असलेल्या या मंडपात वराह मूर्तीची स्थापना केली होती. आज ही मूर्ती आपल्याला भग्नावस्थेत बारवेशेजारील झाडाखाली पाहायला मिळते. मंडपात लोकांना बसण्यासाठी एक कट्टा बांधला आहे. मंडपाच्या बाहेरील बाजूस स्तंभ कोरले आहेत. दोन स्तंभांमधील जागेत विष्णूचे दशावतार व रामायणातील दृश्ये कोरली आहेत.
मंचर आणि लोणी भापकर येथील बारवांमध्ये संरचनात्मक फरक असूनही, त्यांच्यात काही समानता आहे. प्रथमतः, बांधकामाची थोडीफार झीज सोडली तर दोन्ही बारवा ६०० वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत व बारमाही पाणीपुरवठा करतात. यातून बारव बांधणाऱ्या लोकांचे भूजल व मृद्यांत्रिकी ज्ञान दिसून येते. तसेच त्यांचे स्थापत्य कौशल्यदेखील समजते. दुसरे म्हणजे, दोन्ही बारवांची काळजी स्थानिक समुदायांकडून घेतली जाते. उदाहरणार्थ, श्री धनेश राऊत यांनी मुलाखती दरम्यान सांगितल्यानुसार, २०१९ मध्ये मंचरमधील काही स्वयंसेवकांनी एकत्र येऊन बारवेतील गाळ बाहेर काढून तिची स्वच्छता केली. याव्यतिरिक्त दरवर्षी दिवाळीत हे स्वयंसेवक बारवेच्या पायऱ्यांवर तेलाचे दिवे लावून दीपोत्सव साजरा करतात.
निष्कर्ष
या छायाचित्र-निबंधात वर्णिलेल्या बारवांच्या व्यतिरिक्त, पुण्यात आणि आसपासच्या परिसरात अन्य काही बारवा पाहायला मिळतात.परंतु, त्यातील बहुतांश बारवांची दुरवस्था झाली आहे. आज, नळाचे पाणी सहज उपलब्ध झाल्यामुळे बारवांची उपयुक्तता कमी झाली आहे. असे असूनदेखील, वास्तुकलेच्या दृष्टीकोनातून त्या मौल्यवान ठरतात. आपली पारंपारिक वास्तुकला, स्थापत्य निर्मितीचे ज्ञान व पाण्याप्रतीची संवेदना बारवांसारख्या वास्तुंतून व्यक्त होते. जेव्हा आपण बारवेतील पाणी प्रत्यक्ष पाहतो, त्याचा आवाज ऐकतो व त्याला स्पर्श करतो, तेव्हा पाण्याबरोबरचे आपले नाते अधिक घट्ट होते व त्याचे मूल्य आपल्याला उमजते.
References
- Dandawate, P.P.; Joshi, P.S. and Gajul, B.S. 2006. Traditional systems of water management in Maharashtra. In Chakravarty, K.K.; Badam, G.L. and Paranjpye, V. (Eds), Traditional Water Management Systems of India, pp. 3–7. Indira Gandhi Rashtriya Manav Sanghrahalay, Aryan Books International. Bhopal, New Delhi.
- Mandake, G. (Ed). 2003. Man͂car yethīl ī.sa. 1344 madhīl shilalekha. In Shodha nibandha saṇgraha. Akhila Mahārāṣṭra Ithihās Pariṣad. Adhives̍an Akrāve. 2002-03. Chāndvaḍa.
- Marathe, M. 2019. Reimagining water infrastructure in its cultural specificity. Case of Pune. Technical University Darmstadt. urn:nbn:de:tuda-tuprints-92810
- Marathe, M. 2021. Baravas: An architectural exploration of the traditional groundwater storage structures of Pune, India. Ancient Asia. 12:1, pp. 1-1. DOI
- Pāṭhaka, A. 2017. Mahārāṣṭrātīl bārava sthāpatya āni pāramparik jalvyavasthāpan. Aparānt. Pụne.
- Raut, D. 2022. Photograph and video of barav at Manchar.